कोल्हापूर : सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात असावे ही मागणी योग्य व रास्त असून, त्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजीजू यांनी दिली.
सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली, त्यांना निवेदनही दिले. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांनी त्यांचा सत्कार केला.
कोल्हापुरात सर्किट बेंच सर्वसामान्यांच्या दृष्टीने कसे आवश्यक आहे, याबाबत ॲड. संतोष शहा व महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी मंत्री रिजीजू यांच्या समोर विवेचन केले. मंत्री राणे यांनी, सहा जिल्ह्यातील पक्षकार, राजकीय पक्ष, वकील हे गेली ३५ वर्षे सर्किट बेंचसाठी लढा देत असल्याचे सांगितले.
चर्चेअंती मंत्री रिजीजू यांनी, जनतेला सुलभ व परवडणारा असा न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्याबरोबरच देशातील अन्य ठिकाणच्या मागणीचाही केंद्र शासन विचार करत असल्याचे सांगितले. त्याबाबत केंद्र शासन लवकरच धोरणात्मक निर्णय घेईल. राज्याचे मुख्य न्यायमूर्तीही यथोचित निर्णय घेेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चर्चेत महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष व सदस्य ॲड. वसंतराव भोसले, माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांनी भाग घेतला. सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी आभार मानले.
मंत्री अमित शहा यांनाही निवेदनकृती समितीने मंत्री राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी, कायदामंत्री रिजीजू यांची भेट घेऊन सर्किट बेंच निर्णयाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.