कोल्हापूर : अलमट्टी धरणाचा कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला अनुभव वाईट असल्याने आतापासूनच धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत महाराष्ट्र, कर्नाटक या दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सिटीझन फोरमतर्फे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अलमट्टी हटाव, महाराष्ट्र बचाव असा नारा घेऊन कोल्हापुरातील सिटीझन फोरमने मान्सून तोंडावर असताना प्रशासनाला जागे करण्यासाठी गुरुवारी निवेदन देऊन गंभीरपणे लक्ष घालण्याची विनंती केली आहे. अलमट्टीमुळे कोल्हापुरात महापुराची परिस्थिती निर्माण झाली हा इतिहास आहे, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संभाव्य पर्जन्यमान आणि धरणातील विसर्गाच्या बाबतीत आता कडेकोट उपाययोजना कराव्यात, असेही सुचविले. निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात अध्यक्ष प्रसाद जाधव, वैभवराज राजेभोसले, महादेव आयरेक, मनोहर सोरप, किशोर घाटगे, राजेंद्र थोरावडे, संजय कवठेकर, गणेश शिंदे यांचा सहभाग होता.