शाहूवाडी पंचायत समितीचे आरोग्य विभाग सोडून इतर सर्व विभाग नव्या इमारतीमध्ये शिफ्ट केले आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी जुन्या इमारतीमध्ये काम करीत आहेत. या इमारतीभोवती निलगिरीची झाडे इमारतीवर वाकली आहेत. वारा सुटला की येथील कर्मचारी बाहेर जात असतात. झाड पडेल या भीतीने काही कर्मचारी कामावर येत नाहीत. आरोग्य विभागाने बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करूनदेखील बांधकाम विभागाने आरोग्य विभागाच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. पावसाळा सुरू झाला आहे. झाडांच्या फांद्या इमारतीवर पडून संपूर्ण इमारतीला गळती लागली आहे. याच इमारतीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी हे वास्तव करीत असतात. तरीदेखील बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाल्यास संबधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा सभापती विजय खोत यांनी दिला आहे.
शाहूवाडी पंचायत समितीच्या इमारतीवरील झाडे तोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:17 AM