कोल्हापूर : लॉकडाऊन कालावधीतील कामगारांचा निम्मा पगार देण्यास आम्ही तयार आहोत. उर्वरित निम्मा पगार हा राज्य शासन अथवा ‘ईएसआयसी’ने द्यावा, अशी मागणी उद्योजकांनी मंगळवारी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे केली. परवानगी मिळालेल्या आस्थापनातील कामगारांनी कामावर जावे, असे आवाहन गुरव यांनी यावेळी केले.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या (केईए) कार्यालयात उद्योजक आणि साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांची बैठक झाली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. ‘एमआयडीसी’कडून परवानगी मिळालेल्या उद्योजकांनी कारखाने सुरू केले आहेत. ते कामगारांना कामावर बोलावीत आहेत; पण, काही कामगार कामावर येण्यास नकार देत आहेत.
अशा पद्धतीने अनुपस्थित राहणाऱ्या कामगारांच्या पगाराची काय कार्यवाही करावयाची, अशी विचारणा उद्योजकांनी यावेळी केली. मार्च महिन्याचा पगार आम्ही दिला आहे; पण, लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवहार बंद राहिल्याने आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतील एप्रिलचा निम्मा पगार देणे आम्हाला शक्य आहे. पण, उर्वरित पगार हा शासन अथवा ईएसआयसीने द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, आदींसह उद्योजकांनी केली. त्यावर याबाबतचा निर्णय शासनपातळीवरील आहे. त्यामुळे तुमची मागणी शासनापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांनी सांगितले. यावेळी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सचिन शिरगावकर, ‘केईए’चे अध्यक्ष अतुल आरवाडे, ‘मॅक’चे अध्यक्ष गोरख माळी, आदी उपस्थित होते.कामगारांनी मनातील भीती काढून टाकावीपरवानगी मिळालेल्या आस्थापनांतील कामगारांनी कामावर जाणे आवश्यक आहे. उद्योजकांनी बोलावूनही कामगार कामावर गेले नाहीत, तर उद्योजकांकडून त्यांची अनुपस्थिती मांडली जाईल, असे साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांनी सांगितले. कोरोनावरील उपचार हे ‘ईएसआयसी’अंतर्गत होतात. त्यामुळे कामगारांनी मनातील भीती काढून टाकावी. त्यांनी कामावर जावे. जिल्ह्याचे अर्थचक्र सुरू राहण्याच्या दृष्टीने उद्योजक आणि कामगारांनी विचार करावा, असे आवाहन गुरव यांनी केले.
उद्योग सुरू झाल्यानंतरच अर्थचक्राला गती मिळणार आहे. ते लक्षात घेऊन कामगारांनी कामावर यावे. कामगारांचे पगार, त्यांच्या उपस्थितीबाबतचे प्रश्न शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करून सोडविण्यात येतील.- चंद्रकांत जाधव, आमदार