सांगली : साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे रक्कम न दिल्यास, यास पुण्याचे आयुक्त, साखर आयुक्त जबाबदार असून, त्यांच्यासह साखर सहसंचालक, कोल्हापूर यांच्याविरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व जिल्हा सुधार समितीने आज, मंगळवार जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सावंत यांना निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचा भाव एफआरपीप्रमाणे दिलेला नाही. १४ दिवसांच्या आत ही रक्कम देणे गरजेचे आहे. कारखाने कायद्याप्रमाणे गाळप व एफआरपीप्रमाणे रक्कम अदा करीत आहे का नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी साखर आयुक्तांची आहे. कारखान्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करुनही ते टाळाटाळ करीत आहेत. यावेळी संदीप राजोबा, अमित शिंदे, महेश खराडे, सनद पाटील, विशाल शिंदे, दीपक सदानंद, रोहित पाटील, दीपक सत्याप्पा उपस्थित होते. (प्रतिनिधी)अभ्यास करू : सावंतपोलीसप्रमुख सावंत म्हणाले की, कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन यातून मार्ग काढून पुढील कार्यवाही केली जाईल. अशाप्रकारची तक्रार प्रथमच आली आहे.
साखर आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By admin | Published: January 06, 2015 11:27 PM