गारगोटी : संत बाळूमामा देवस्थानची कागदपत्रे मिळावीत, यासाठी समितीचे विश्वस्त सचिव रावसाहेब कोणेकरी यांनी भुदरगड पोलिसांत अर्ज दाखल केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थान समितीत अंतर्गत वाद सुरू आहे. सध्या या देवस्थान समितीचे सचिव रावसाहेब कोणेकरी यांनी देवस्थानचे प्रोसेडिंग, मासिक सभा इतिवृत्त, इतर कागदपत्रे सचिव या नात्याने आपल्या ताब्यात मिळावीत, यासाठी भुदरगड पोलिसांत अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर समितीच्या १२ पैकी ८ विश्वस्त सदस्यांनी सह्या केल्या आहेत. त्यामुळे या समितीतील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे.अर्जातील आशय असा, देवस्थानची कागदपत्रे जानेवारी २०२३ मध्ये विश्वस्त समितीचे कार्याध्यक्ष राजाराम बापूसो मगदूम व त्यांच्यासोबत असणारे संजीत रामदास कदम दोघेही (रा. नरतवडे, ता. राधानगरी) यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सचिव रावसाहेब कोणेकरी यांच्याकडून मागून घेतलेली होती. कार्याध्यक्ष मगदूम यांचे एक महिन्यांपूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांच्यासोबत असणारे संजित कदम हे कागद देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ही कागदपत्रे सचिव यांच्या ताब्यात देण्याची मागणी अर्जात केली आहे.या तक्रार अर्जावर विश्वस्त लक्ष्मण बाबूराव होडगे, पुंडलिक हणमाप्पा होसमनी, शिवाजी लक्ष्मण मोरे, तमन्ना मासरेडी, रामन्ना तिमाप्पा मरेगुद्दी, भिकाजी बापू शिणगारे व आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांच्या सह्या आहेत.याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रार दाखल झाल्यानंतर आपले मत देतो, असे सांगितले. याबाबत विश्वस्त सरपंच विजय गुरव म्हणाले, गोरगरीब भक्त मनोभावे आपल्या कष्टाचा पैसा बाळूमामा यांच्या चरणी अर्पण करतात; पण देवस्थानच्या कारभाऱ्यांनी यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरकारभार केला असून, याची योग्य त्या खात्यामार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करायला भाग पाडणार. यासाठी प्रसंगी ग्रामस्थ आणि भक्तांना सोबत घेऊन जनआंदोलन उभे करू.
Kolhapur- आदमापुरातील संत बाळूमामा देवस्थानच्या कागदपत्रांची मागणी, समितीतील संघर्ष शिगेला पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 1:48 PM