आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २२ : कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी या आंदोलनाचा दुसरा दिवशी करवीर उपविभागातील कृषी सहाय्यकांनी सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, सरचिटणीस जयपाल बेरड, कार्याध्यक्ष विकास ठोंबरे, उपाध्यक्ष शिवाजी काशीद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. नवनिर्मित ‘जल व मृदुसंधारण’ विभागाकडे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी कायमस्वरूपी वर्ग होण्यापूर्वी मूळ कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा, या आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे. कृषी सहाय्यकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात यावीत, अशा विविध मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.
मंगळवारी (दि.२७) लाईन बाजार, कसबा बावडा येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर कृषी सहाय्यकांतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यातील कृषी सहाय्यक सहभागी होणार आहेत. आंदोलनात संभाजीराव यादव, किरण मोर्ती, विठ्ठल चव्हाण, राजेंद्र कोरे, विजय खोराटे, सुभाष मगदूम, सुजाता तावरे आदी सहभागी झाले होते.