जहांगीर शेख :
कागल : कर्नाटक राज्याच्या हद्दीत कोगनोळी सर्कल येथे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी चारचाकी वाहनासह दुचाकी आणि बैलगाड्यांचीही तपासणी करून महाराष्ट्रातील लोकांना परत पाठविण्याची भूमिका घेतली आहे. येथील दुधगंगा नदीवर कागल-करनूरदरम्यान नवा पूल असावा या जुण्या मागणीला पुन्हा जोर आला आहे. कर्नाटक पोलिसांची तपासणी हा जरी आताचा मुद्दा असला तरी कागल-करनूर दरम्यान महाराष्ट्र हद्दीत पूल हवा ही मागणी चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीची आहे.
महामार्गावर दुधगंगा नदीवर साधारणतः १९०० सालादरम्यान इंग्रजांनी दगडी पूल बांधला. या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून पर्यायी पूल बांधला आहे. परंतु महामार्ग चौपदरीकरणात एक पूल याच ठिकाणी निर्माण केला. हे सर्व पूल कर्नाटक हद्दीत आहेत. कागलहून करनूर, वंदूर सुळगाव, शंकरवाडी, शेंडुरला जाताना नदीच्या पुलापासून करनूर गावच्या हद्दीपर्यंत कर्नाटकातून प्रवास करावा लागतो. हा असा वळसा घालून कागल, कोल्हापूरला जाण्यापेक्षा करनूर कागल असा जुना रस्ता आहे. या रस्त्यावर जर छोटा पूल अथवा बंधारा बांधला तरी रस्ता दळण-वळणासाठी जवळचा आणि वेळ व खर्चाची बचत करणारा ठरेल. आणि शेती व शेतकरी वर्गालाही याचा लाभ होईल.
चौकट
● असा आहे हा जुना मार्ग...
काळम्मावाडी धरणाचे पाणी दुधगंगा नदीतून येण्यापूर्वी पावसाळा संपला की नदी कोरडी पडायची. तेव्हा हा रस्ता खुला होत होता. करनूरमधून निघालेली पाणंद नदीच्या पलीकडील कागल हद्दीतील जाधव मळ्याजवळून सध्या आर.टी.ओ ऑफिसच्या पाठीमागून महामार्गाला येऊन मिळतो. नदीला बारमाही पाणी येण्यापूर्वी हाच हक्काचा रस्ता होता. आता पूल अथवा बंधारा झाला की पुन्हा एकदा या रस्त्याचे अस्तित्व ठळक होईल.
● कोट
सध्या कोगनोळी बाॅड्रीवरून या भागातील लोक कागल, कोल्हापूरला जातात; पण करनूर कागल या जुन्या पाणंदी रस्त्याला ऐतीहासिक परंपरा आहे. परंपरागत दळण-वळणाची साधने आसलेल्या काळात हा चार- पाच गावांसाठी राजमार्ग होता. आज जरी याची उपयुक्तता कमी वाटत असली तरी या मार्गाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. भविष्यात महाराष्ट्र हद्दीत दुधगंगा नदीवर पूल असणे गरजेचे व उपयुक्त ठरणार आहे. -सौ. कविता घाटगे, सरपंच, करनूर