कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठीशी आहे. येथील पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे मागणी करणार आहे, असे सांगून खासदार फंडातून पूरग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जाहिर केली.आठवले यांनी जिल्ह्यातील पूरपस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी सांगलीसाठी २५ लाख आणि कोल्हापूरसाठी २५ लाख रुपयांची मदत मी जाहिर करतो, अशी घोषणा आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, यावेळी शहाजी कांबळे, उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.
सुरक्षित स्थळी घरं बांधता येतील असा आराखडा तयार करण्याच्या सूचना
आठवले म्हणाले, रांगोळी, रेंदाळ, हुपरी, इंगळी, पट्टणकोडोली गावच्या संरपंचांशी आज चर्चा केली. पूराचा सामना करण्यासाठी सुरक्षित स्थळी घरं बांधता येतील असा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. शासनाकडून मदत मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे मागणी करणार आहे. विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना नुकसान भरपरई मिळावी त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.
खासदार, आमदार, उद्योजक यांनीही पुढे येऊन मदत करावी
खासदार, आमदार, उद्योजक यांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. पूरग्रस्तांना सोयी मिळत असल्याची माहिती आज दौऱ्या दरम्यान मला पूरग्रस्तांनकडून मिळाली. प्रशासनाच्या सोबत कोल्हापूरकर मदत कार्यात अग्रेसर आहेत त्यांचे धन्यवाद, अशा शब्दात आठवले यांनी मदतकर्त्यांचे आभार मानले.
नदया जोड प्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविलेला नदया जोड प्रकल्प गेल्या ६०-६५ वर्षात राबवला असता, तर अशी वेळ आली नसती.