मलकापूर : करंजोशी येथील अल्फोन्सा शाळेत सुरू केलेल्या कोविड सेंटरवर रेमडेसिविर इंजेक्शन तात्काळ देण्यात यावे, याबाबत जिल्हाधिकारी दौलत यांनी विशेष लक्ष घालावे. तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची तात्काळ सोय करावी, अशी मागणी शाहूवाडी पंचायत समितीचे सभापती विजय खोत यांनी केली आहे. शाहूवाडी पंचायत समिती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
विजय खोत म्हणाले की, शाहूवाडी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली असून, तालुक्यात पहिले कोविड सेंटर अल्फोन्सा स्कूल, करंजोशी येथे सुरू केले आहे. या ठिकाणी ७६ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांना आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शन या सेंटरवर उपलब्ध होत नाही. मात्र खासगी रुग्णालयात हे उपलब्ध होत आहे. मग शासकीय मान्यतेने सुरू केलेल्या कोविड सेंटरवर इंजेक्शन मिळत नाही. यामुळे दुर्गम भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संबंधित विभागाला तातडीने आदेश देऊन इंजेक्शन्स तात्काळ उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.
तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या २८० झाली आहे. पत्रकार परिषदेस उपसभापती दिलीप पाटील, पंचायत समिती सदस्या डॉ. स्नेहा जाधव, सुनीता पारळे, लतादेवी पाटील आदींसह सदस्य उपस्थित होते .