इचलकरंजी : ‘मातीत गाडा, नाही तर तुरुंगात घाला; पण वारणेचे पाणी इचलकरंजीला देऊ देणार नाही’, अशी निर्वाणीची भूमिका वारणा बचाव कृती समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर जाहीर केली. याचा परिणाम आता वारणा नळ योजना लांबणीवर पडण्यात होणार आहे. दरम्यान, शहराला तीन दिवसांतून एक वेळ का होईना, पाणी देणाºया कृष्णा नळ योजनेची दाबनलिका व पंप बदलून पाणीपुरवठा चालू ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सुमारे तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असणाºया इचलकरंजी शहराला पंचगंगा व कृष्णा या दोन नळ योजनांमधून पाणीपुरवठा होतो. पंचगंगा नळ योजना ही चाळीस वर्षांपूर्वीची, तर कृष्णा नळ योजना अठरा वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे दोन्ही योजनांतून ४५ दशलक्ष लिटरऐवजी ३६ दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते. त्यामुळे तीन दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो.
स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी वारणा नदीवरून दानोळी येथून नळ पाणी योजना करावी, असा अभिप्राय जीवन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने दिला. म्हणून ६८.६८ कोटी रुपये खर्चाची वारणा योजना राबविण्याचे ठरले. जॅकवेल, पॉवर हाऊस, पंप हाऊस, आदींसाठी निघालेली ३५ कोटी रुपयांची निविदा कंत्राटदार आर. ए. घुले यांना मंजूर झाली. त्यांना वर्क आॅर्डर देऊन नऊ महिने उलटले आहेत.
अशा पार्श्वभूमीवर वारणा नदीतून पाणी उचलण्यासाठी दानोळी व वारणा नदीकाठावरील अनेक गावांनी विरोध दर्शविला आहे. यापूर्वी इचलकरंजीतील प्रांत कार्यालय, शिरोळ येथील तहसीलदार कार्यालय व कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठका झाल्या. मात्र, त्यामध्ये तोडगा निघाला नाही.
आता सोमवारी (दि.१५) झालेल्या बैठकीतसुद्धा वारणा बचाव कृती समितीचा कडवा विरोध कायम राहिला आहे. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, इचलकरंजी व वारणाकाठ या दोघांसाठी सन्माननीय तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली; पण वारणाकाठचा विरोध पाहता इचलकरंजीसाठी वारणा योजना नजीकच्या दोन वर्षात होणे अशक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. दरम्यानच्या काळात कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेने जोरदार प्रयत्न करावेत, अशी मागणी आहे.धरणात पाणी असताना विरोध अनाकलनीयवारणा धरणात ३४.३६ टीएमसी पाणी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ९.५४ टीएमसी, शेती सिंचनासाठी १०.८१ टीएमसी व औद्योगिक वापरासाठी १.२७ टीएमसी इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ४.३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी दिले जाते. इचलकरंजीस पिण्याच्या पाण्यासाठी एक टीएमसी पाणी आरक्षित आहे.शेतीसाठी वापरात न आलेल्या पाण्याचा शिल्लक साठा ५.४६ टीएमसी आहे. त्यामुळे शेती सिंचनासाठी अद्यापही भरपूर पाणी शिल्लक आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यातील शिल्लक असलेलेच पाणी इचलकरंजीसाठी उपसा करण्यात येणार आहे. मग, इचलकरंजीच्या पाण्यासाठी विरोध का? असा प्रश्न विचारला जात आहे.