सरूड : सरूड (ता. शाहूवाडी) येथील नारायण पेठेतील भरवस्तीत धोकादायक स्थितीमध्ये असणारे दोन विद्युत खांब त्वरित बदलण्याची मागणी येथील नागरिकांतून होत आहे.
नारायण पेठेमधील या दोन्ही खांबांवरून गावातील मुख्य विद्युत वाहक तारा गेल्या आहेत. अवजड वाहन धडकल्याने हे दोन्ही विद्युत खांब वाकले गेले असून, ते एका बाजूला झुकल्याने, तसेच गंजल्याने गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीमध्ये आहेत. या धोकादायक खांबांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गेेल्याच आठवड्यात या दोन खांबांदरम्यान जोडण्यात आलेल्या विद्युत तारा शॉर्टसर्किटमुळे तुटून पडल्या होत्या. त्यामुळे हे दोन्ही खांब नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. हे खांब बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांतून होत आहे. परंतु वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाकडून या मागणीची दखल न घेता याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फोटो ओळी :
सरूड येथील धोकादायक स्थितीत असणारे विद्युत खांब.