लोकमत न्यूज नेटवर्क
सडोली (खालसा) : वाशी (ता.करवीर) येथील बिरदेवाची त्रेवार्षिक जळ यात्रा १४ ते १७ मार्च दरम्यान होणार आहे. आजबाजूच्या राज्यातून लाखभर भाविक यात्रेसाठी हजेरी लावत असतात. कोरोना रोगाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी शासनाशी चर्चा करून यात्रेसंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन कडक निर्बंध लावावेत, अशी मागणी करण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान समिती, गावातील ज्येष्ठ मंडळी, मानकरी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पाच राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशी येथील बिरदेवाची यात्रा तीन वर्षातून एकदा भरते. त्रेवार्षिक जळ यात्रेस लाखो भाविक आपल्या कुटुंबासह वाशी येथे धार्मिक विधी पार पाडण्यासाठी हजेरी लावतात. या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात ही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू असून, राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने गावस्तरावर बैठकीत आम्ही यात्रा रद्दचा निर्णय घेतला.
परराज्यांतून लाखो भाविक या यात्रेसाठी हजेरी लावत असल्याने या यात्रेचा विषय राज्यस्तरावरील असल्याने होणाऱ्या यात्रेचे गांभीर्याने विचार करून जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावण्याची गरज आहे, अशी मागणी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, देवस्थान समितीचे सदस्य, मानकरी, गावतील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.