जयसिंगपूर : साखरेचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिले मिळणे अडचणीचे ठरत आहे. ठरल्याप्रमाणे राज्यशासनाने बाजारातील ३२ रुपये किलोप्रमाणे १० लाख टन साखर खरेदी करावी, अशी मागणी मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. भूविकास बँकेतील शेतकºयांची थकीत कर्जे माफ करावीत, अशीदेखील मागणी यावेळी करण्यात आली.
अनेक साखर कारखान्यांनी अंतिम दरदेखील देण्यास नकार दिला आहे. मध्यंतरी साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंंटल होते. मात्र, सध्या २८०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. याचाच परिणाम शेतकºयांच्या बिलावर झाला आहे. शेतकºयांच्या बिलात प्रतिटन ५०० रुपयांची बेकायदेशीर कपात केली आहे. त्यामुळे शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला असून, साखर कारखाने शेतकºयांना उर्वरित बिले देण्यास नकार देत आहेत. साखरेच्या दरात हस्तक्षेप करीत राज्य सरकारने ३२ रुपये किलोप्रमाणे १० लाख टन साखर खरेदी करण्याचे आश्वासन देखील दिले होते.
मात्र, अद्यापही यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे साखरेचे दर वारंवार कोसळत आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना करावी. तसेच भूविकास बँकेतील ३७ हजार थकबाकीदार शेतकरी असून, त्यांच्या थकीत कर्जाची आकडेवारी ९४६ कोटी इतकी आहे. सध्या राज्यातील भूविकास बँक अवसायनात काढण्यात आली आहे. अनेक साखर कारखान्यांनी शेतकºयांना बँकेच्या माध्यमातून कर्जाचे वाटप केले असून, शेतकºयांनी पण साखर कारखान्यांकडे भरणा केला आहे. मात्र, कारखान्यांनी तसेच संस्थांनी बँकेकडे कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे तो बोजा शेतकºयांच्या सात-बारावर चढलेला आहे. सध्याच्या कर्जमाफीत याचा समावेश केला नाही.
ओटीएस अंतर्गत ९४६ कोटी रुपयांचे कर्ज २३३ कोटी होते. हे कर्ज शासनाने भरल्यास ३७ हजार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. तरी शासनाने त्वरित यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्यावतीने सहकारमंत्री देशमुख यांना देण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य सावकार मादनाईक, भगवान काटे, जालिंंदर पाटील, सागर चिपरगे उपस्थित होते.
मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना निवेदन देताना सावकर मादनाईक. शेजारी प्रा. जालिंदर पाटील, भगवान काटे उपस्थित होते.