सांगली : सत्तेचा दुरुपयोग आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोटाळे करून काँग्रेस आणि भाजप निवडणुका जिंकत आहे़ मतदारांना मत कुणाला दिले ते कळाले पाहिजे़ वोटिंग मशीनमध्ये बदल करून मतदारांना त्याची पावती देण्याची व्यवस्था करूनच विधानसभा निवडणुकीत त्याचा वापर करावा़ अन्यथा भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन छेडतील, असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिला़इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये त्रुटी असल्याच्या प्रश्नावर मतदारांमध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जनजागरण अभियान राबविले जात आहे़ सांगली येथे आज (बुधवारी) झालेल्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेश्राम बोलत होते़ ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांना बदल्यांच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून मतदान यंत्रांमध्ये बदल करून घेतला जात आहे़ निवडणूक आयोग आणि अधिकारीही लोकशाहीची थट्टा करीत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील मतदान पध्दतीमध्ये बदल केला पाहिजे़ मतदाराला मत कुणाला दिले ते कळले पाहिजे़ तसा बदल मशीनमध्ये करून घ्यावा़ अन्यथा आम्ही देशभर तीव्र आंदोलन सुरू करू, असा इशाराही त्यांनी दिला़बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकर म्हणाले की, घटनेची कडक अंमलबजावणी केल्यास सर्वांचेच भले होईल.यावेळी संत गाडगेबाबांचे नातू हरिनारायण जानोरकर, तानाजी मालुसरेंच्या वंशज कवयित्री शीतल मालुसरे, विष्णू खंडागळे, मौलाना याकूब, याहब कासमी, नगरसेविका शेवंता वाघमारे, भारत मुक्तीचे जिल्हाध्यक्ष हाजी दस्तगीर मलीदवाले उपस्थित होते़ प्रास्ताविक सचिन आवळे यांनी केले़ (प्रतिनिधी)
मतदान यंत्रांच्याद्वारे लोकशाहीचीच थट्टा!
By admin | Published: July 23, 2014 10:58 PM