एकनाथ पाटील- कोल्हापूर -कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी खासगी सावकारांकडून लोक व्याजाने कर्ज घेत असतात; परंतु हे सावकार मनमानीपणे व्याज आकारून गोरगरिबांची कुटुंबे उद्ध्वस्त करत आहेत. महिला दिनानिमित्त स्त्रियांचा सर्वत्र सन्मान होत असताना वडणगे (ता. करवीर) येथे व्याजाच्या वसुलीसाठी महिलेचे अपहरण करून तिला अमानुषपणे मारहाण करून डांबून ठेवणाऱ्या खासगी सावकाराचे कृत्य कोल्हापूरच्या संस्कृतीला लज्जास्पद आहे. खासगी सावकारांची दहशत नागरिकांच्या जिव्हारी आली आहे. पोलीस प्रशासनाने अशा सावकारांना वेळीच ठेचणे आज काळाची गरज बनली आहे. शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. महिलादिना दिवशीच महिलेचे अपहरण करून तिला डांबून ठेवण्याचे घृणास्पद कृत्य खासगी सावकारांनी केले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात असंतोष निर्माण झाला आहे. सावकारकीचा फास संपूर्ण जिल्ह्याभोवती आवळत आहे. त्याला वेळीच ठेचण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. खासगी सावकारांकडून गरीब, गरजू लोकांना मुलीचे लग्न, शिक्षण, घरबांधणीसह अन्य कारणांसाठी हजारो रुपयांचे कर्ज दिले जात आहे. सुरुवातीस कर्ज परत करण्यासाठी तगादा लावला जात नाही; परंतु त्यानंतर त्यांना व्याजासह मुद्दल देण्यासाठी सतावून सोडले जाते. गरीब लोकांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत या सावकारांनी अनेकांची घरे, जमिनी व वाहने हडप केली आहेत. दरमहा १५ ते २५ टक्के व्याजदराने ते कर्ज पुरवितात. त्यामुळे मूळ कर्जापेक्षा त्याचे व्याज देताना कर्जदार पुन्हा कर्जाच्या खाईत सापडतो. ही वसुली करण्यासाठी सावकारांनी काही गुंड पोसले आहेत. त्यांच्याकडून वेळप्रसंगी दमदाटी व मारहाणही केली जाते. त्यामुळे या सावकारांविरोधात पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार देण्याचे धाडस कोणी करीत नाहीत. जाचक अटींमुळे सावकारी पर्यायबँका किंवा पतसंस्थेतून कर्ज मिळविण्यासाठी कागदपत्रे, जामिनाची जुळवाजुळव करताना नागरिकांची दमछाक होते. त्यामुळे आर्थिक अडचण सोडविण्यासाठी अखेरचा सोपा मार्ग म्हणून लोक सावकारांकडून कर्ज घेतात. अशावेळी ते व्याजाचा विचार करीत नाहीत. सावकार कर्जदाराकडून दोन कोरे धनादेश घेतले जातात. स्टॅम्प करून स्थावर मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेतली जातात. हा व्यवहार नियमबाह्य असतो. सावकारी मोडीत काढा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. नागरिकांनीही निर्भयपणे तक्रार देण्यास पुढे यावे, त्यांना न्याय दिला जाईल. - प्रदीप देशपांडे, पोलीस अधीक्षक बिहारी गुंडांकडून वसुली खासगी सावकारीमध्ये काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा आहे. पेठेतील एका पुढाऱ्याने सानेगुरुजी वसाहत, रिंगरोड येथील बनावट दस्ताद्वारे करोडो रुपयांच्या जमिनी हडप केल्या आहेत. त्याच्या विरोधात पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याने काही धाडसी लोकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. कुळे बाहेर काढणे, व्याजाने पैसे फिरविणे, वसुली करणे यासाठी ते बिहारी गुंडांचा वापर करतात. या गुंडांचे वास्तव शिंगणापूर परिसरात असल्याची चर्चा आहे.
सावकारकीमुळे कुटुंबे उद्ध्वस्त
By admin | Published: March 10, 2016 12:47 AM