जिल्हाधिकारी राहुल रेखावार दुपारी देवस्थान समितीच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी सगळ्या कामकाजाची चौकशी केली. दरम्यान, त्यांना गेली दोन वर्षे लॉकडाऊन असतानाही अंबाबाई मंदिरात ६०च्या वर सुरक्षारक्षक काम करीत असल्याचे आढळले. सगळं बंद असताना एवढे सुरक्षारक्षक का ठेवले गेले याची विचारणा करीत त्यांनी नऊ वगळता बाकीचे सगळे खासगी सुरक्षा रक्षक काढून टाकण्याचे आदेश दिल्याचे, तसेच त्यांची भरती कशी झाली याची माहिती मागविल्याचे कळले.
गेल्या दहा वर्षांपासून मंदिराचे प्रभारी व्यवस्थापक म्हणून धनाजी जाधव यांची नियुक्ती आहे. एकाच पदावर इतकी वर्षे एकच व्यक्ती कशी आणि हे पद कायम प्रभारीच का ठेवण्यात आले, ते का भरले गेले नाही, दर तीन वर्षांनी बदल्यांचा नियम असताना कर्मचाऱ्यांची बदली का केली जात नाही अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी झाडाझडती केली. समितीतील एकाच कर्मचाऱ्याला आधी हरकाम्या, नंतर मदतनीस, पुढे सॅनिटरी इन्स्पेक्टरपदाची ऑर्डर देण्यात आली होती त्यासह विविध प्रकरणाची त्यांनी चौकशी केल्याचे समजले.
---
विजय पोवार कार्यमुक्त , शिवराज नायकवडी नवे सचिव
गेल्या सहा वर्षांपासून समितीचे सचिव म्हणून विजय पोवार हे कामकाज पाहत होते. त्यांना तीन वेळा मुदत वाढ देण्यात आली होती जी ३१ ऑगस्ट रोजी संपली. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार त्यांना बुधवारी कार्यमुक्त करण्यात आले व नवी नियुक्ती होईपर्यंत सचिव पदाचा कार्यभार धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधीक्षक शिवराज बंडोपंत नायकवडी यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांनी यापूर्वीही सचिवपद रिक्त असताना काम केले आहे.
----
सुरक्षारक्षकांबाबत ९ तारखेला सुनावणी
निवृत्त सैनिक असलेल्या सुरक्षारक्षकांच्या प्रश्नी सध्या निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. गुरुवारीदेखील यावर सुनावणी होऊन ९ तारखेला सचिवांना त्यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. १५ सप्टेंबरपर्यंत याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.
-----