कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कोविड-१९ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, त्याकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. याच लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत कोविड-१९ लसीकरणाचे प्रात्यक्षिक पंचगंगा हॉस्पिटल येथे शुक्रवारी घेण्यात आले. ही मोहीम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक चार - पंचगंगा येथे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या ड्रायरन प्रात्यक्षिकाचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ. अमोलकुमार माने, लसीकरण अधिकारी डॉ. रूपाली यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश औंधकर, पंचगंगा रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी नियोजन केले. हा ड्रायरन सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आला. यासाठी २५ आरोग्य कर्मचारी यांची नोंदणी संगणकीकृत करण्यात आली होती. त्याप्रमाणे २५ कर्मचारी यांचे कोविड-१९ लसीकरणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
ड्रायरनमध्ये प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष स्थापन करण्यात आला होता. या कक्षामध्ये एकूण पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन त्यांना नेमून दिलेल्या कामाप्रमाणे लाभार्थींच्या नोंदणीची खात्री करून ओळखपत्र पुरावा कोविड-१९ पोर्टलवर तपासून त्यांचे लसीकरण प्रात्यक्षिक करण्यात आले. लसीकरण प्रात्यक्षिकावेळी शासन मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व बाबींचा अवलंब करण्यात आला. लसीकरणानंतर लाभार्थीला ३० मिनिटे निरीक्षण कक्षामध्ये थांबविण्यात येऊन त्या लाभार्थीला कोविड-१९ बाबत आरोग्य शिक्षण देण्यात येऊन प्रात्यक्षिक पार पाडण्यात आले.