कोल्हापूर : ‘मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला’,‘एवढे सैनिक कशाला गद्दारांना गाडायला’, ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’च्या घोषणांनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी शिवसैनिक ठाम असल्याच्या समर्थनात आज, शुक्रवारी कोल्हापुरात भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दुपारी १२ वाजता दसरा चौकातून या पदयात्रेला सुरूवात झाली होती. यावेळी महिलांचीही संख्या लक्षणीय होती. दरम्यान, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना इशारा दिला. शिवसेनेत अशी किती वादळे आली आणि गेली. परंतू शिवसेनेला ‘चॅलेंज’ देणारी औलाद अजून जन्माला यायचीय अशा शब्दात दुधवडकर यांनी शिंदे यांना इशारा दिला.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढला. यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अजून आम्ही ‘गोडावून’ उघडलेले नाहीएकेरी नाव घेत दुधवडकर म्हणाले, छगन भुजबळ गेले. नारायण राणे गेले आता हा एकोबा गेला आहे. आज उद्धव ठाकरे यांना पाठबळ देण्यासाठी झालेली शिवसैनिकांची गर्दी ही केवळ ‘शोरूम’ आहे. अजून आम्ही ‘गोडावून’ उघडलेले नाही. यापुढे मातोश्रीवरून जो आदेश येईल त्याचे पालन करा.नवे ५६ निवडून आणण्याची शिवसेनेत ताकद
खासदार मंडलिक म्हणाले, कोणी दबावाने, कोणी अमिषाने कोणी गोड बोलण्याने गेला असेल तर त्यांनी विधानसभेत आल्यानंतर तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घ्यावा. मुरलीधर जाधव म्हणाले, ५६ जरी गेले तरी नवे ५६ निवडून आणण्याची ताकद शिवसेनेत आहे. गेलेले हे सर्वजण सुर्याजी पिसाळ यांची औलाद आहे.