इचलकरंजी : सुताची दरवाढ व साठेबाजी याविरोधात येथील यंत्रमागधारक संघटनांच्या कृती समितीच्या वतीने सूत मार्केट आणि मलाबादे चौकात शनिवारी निदर्शने केली. या मागणीसंदर्भात लवकरच एक संयुक्त बैठक बोलावली जाईल. त्यातूनही सूत व्यापाऱ्यांनी नफेखोरी न थांबविल्यास याविरोधात आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
सूत व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीविरोधात इचलकरंजीतील सर्व यंत्रमागधारक संघटना एकवटल्या आहेत. या संघटनांच्या कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी इचलकरंजीच्या यंत्रमाग व्यवसायावर मोठे होऊन त्यालाच नुकसानीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या सूत व्यापाऱ्यांनी नैतिकता पाळावी. सततच्या सूत दरवाढीमुळे यंत्रमागधारक अडचणीत येत आहेत, अशा भावना सतीश कोष्टी यांनी व्यक्त केल्या.
सागर चाळके यांनी उद्योगाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जागरूकतेने याविरोधात आंदोलन उभारण्याची गरज आहे. सूत व्यापाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेऊन यंत्रमागधारक संघटनांना चर्चेसाठी वेळ द्यावी अन्यथा आमदार, खासदारांची भेट घेऊन प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे सूत दरवाढप्रश्नी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. विनय महाजन व प्रकाश मोरे यांनी सुताच्या काऊंटमध्ये आणि वजनातही तफावत असते. खरेदी केलेल्या सुताचे बिल न देता वेगळ्या काऊंटच्या सुताने बिल दिले जाते. एकूणच चुकीच्या पद्धतीने व्यापार करून सूत व्यापारी कारखानदारांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप केला.
आंदोलनात दत्तात्रय कनोजे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग धोंडपुडे, बाळासाहेब कलागते, प्रकाश गौड, अमित गाताडे, विकास चौगुले यांच्यासह कारखानदार सहभागी झाले होते.
.................
उपस्थित नसल्याने निषेध
आंदोलनाबाबत पूर्वसूचना देऊनही सूतव्यापारी प्रतिनिधी सूत बाजारात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे कृती समितीच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला.
(फोटो ओळी)
इचलकरंजीत यंत्रमाग संघटना कृती समितीने सूत दरवाढीविरोधात निदर्शने केली.