कोल्हापूर : कोल्हापूरचे चित्रकार नागेश हंकारे आणि रमण लोहार यांच्या चित्रांचे हिमाचल प्रदेशातील मनाली येथे भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन म्हणजे कोल्हापूरच्या कलाक्षेत्रातील एक मानाचा तुरा मानावा लागेल.हिमाचल प्रदेश येथील कुल्लू जिल्ह्यातील मनाली येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन रशियन क्युरेटर डॉ. लेरिसा यांचे हस्ते झाले. यावेळी इंडियन क्युरेटर डॉ. रमेश चंद्रा, चंदीगडच्या ललितकला अकादमीच्या सेक्रेटरी आणि प्रसिद्ध चित्रकर्ती डॉ. साधना संगर, दिल्लीचे चित्रकार घनश्याम तसेच दिगंबर गवळी, आदी उपस्थित होते.या प्रदर्शनात मनालीचे दर्शन घडविणारी तसेच बुद्धांच्या जीवनावरील एकूण ३५ चित्रे मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन निकोलस रोरिक इंटरनॅशनल आर्ट गॅलरी, नग्गर येथे १ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. नागेश हंकारे यांची आतापर्यंत ४६ प्रदर्शने झाली असून, इंटरनॅशनल गॅलरीतील हे नववे प्रदर्शन आहे.