कोल्हापूर : चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी ‘आगामी विधानसभा लढविणारच’ असे स्पष्ट न सांगता कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ‘आपण की नंदाताई बाभूळकर या लढणार हे निश्चित करू,’ अशी तळ्यात-मळ्यात भूमिका घेतली. राधानगरी-भुदरगडमधून के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीवर दावा केला.
राष्टÑवादी कॉँग्रेसकडून शनिवारी आमदार शशिकांत शिंदे, अण्णासाहेब डांगे, सुरेश पाटील या निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती शासकीय विश्रामगृहात घेतल्या. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे उपस्थित होते. सकाळी ११ वाजता कागलमधून हसन मुश्रीफ व भैया माने यांनी मुलाखत दिली. त्यानंतर आमदार संध्यादेवी कुपेकर व एम. जे. पाटील यांनी मुलाखत दिली.
‘दक्षिण’मधून रोहित पाटील, महादेव माने, निरंजन कदम यांनी; तर ‘करवीर’मधून मधुकर जांभळे, सोनाजी पाटील यांनी मुलाखत दिली. हातकणंगलेमधून भास्कर शेटे, अनिल कांबळे, लखन बेनाडे यांनी मागणी केली. इचलकरंजीतून नितीन माने व बाळासाहेब देशमुख यांनी, तर शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर व चंगेजखान पठाण यांनी मुलाखत दिली. यड्रावकर यांना उमेदवारी देणार असाल तर आपला आग्रह राहणार नसल्याचे पठाण यांनी सांगितले.
राधानगरी-भुदरगडमधून ए. वाय. पाटील यांनी समर्थकांसह मुलाखत दिली. गेली २५-३० वर्षे शरद पवार यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून काम करीत आहे. के. पी. पाटील हे चार वेळा लढले. त्यांतील दोन वेळा ते पराभूत झाले. आता आपले वय ६० असल्याने पुढे संधी नाही. त्यात राधानगरीत सर्वाधिक मतदान असताना संधी मिळत नसल्याने नाराजी आहे, असे ए. वाय. पाटील यांनी सांगितले.
‘भोगावती’चे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, उमेश भोईटे यांना घेऊनच के. पी. पाटील मुलाखतस्थळी पोहोचले. या सर्वांनी के. पी. पाटील यांना उमेदवारीची मागणी केली. दरम्यान, शशिकांत शिंदे म्हणाले, दहाही मतदारसंघांत पक्षाकडे ताकदीचे उमेदवार आहेत. १५ आॅगस्टपर्यंत घोषणा केली जाईल.‘उत्तर’मधून व्ही. बी. पाटील यांची मागणीकोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ आघाडीमध्ये कोणाला सुटणार हा पेच असताना उद्योगपती व्ही. बी. पाटील यांनी येथून लढण्याची तयारी केली आहे. त्यांनी राष्टÑवादीकडे तशी मागणी केली असून त्यांच्यासह आर. के. पोवार, हसिना फरास, आदिल फरास, रोहित पाटील, जहिदा मुजावर, महेंद्र चव्हाण यांनी मागणी केली.