कोल्हापूर : भरमसाट वाढलेले पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसोा गलांडे यांना दिले.जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या महामारीमुळे आधीच रोजगारावर गदा आली आहे. कमाई तुटपुंजी झाली आहे. अशात जनता भरडून निघाली असताना वाढीव दराने वीज बिलांची आकारणी करून ती सक्तीने वसुलीचा सपाटा महावितरणने लावला आहे.
महागाईने कहर केल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत चरितार्थ चालवणे अवघड बनत चालल्याने सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी, वीज बिलांची माफी द्यावी; अन्यथा आता शांत असलेली जनता पुढे रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला.
आंदोलनात अभिजीत भोसले, संदीप यादव, नीलेश सुतार, अभिजीत कांजर, भगवान कोईगडे, सागर गुरव, शाहबाज शेख, राजू राऊत, मदन परीट, सचिन गुरव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.