कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या संभाव्य हद्दवाढीतून पुलाची शिरोली, नागावसह शिरोली एमआयडीसी, आदींना वगळावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज, सोमवारी महापालिकेच्या दारात जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला. ग्रामस्थांच्यावतीने आमदार डॉ. सुजित मिणचेकर व माजी आमदार राजीव आवळे यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदन दिले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने दुचाकीवरून आलेल्या ग्रामस्थांनी महापालिकेच्या दारात ठिय्या मांडला. ‘हद्दवाढीस पाठीशी घालणाऱ्या राक्षसांचा धिक्कार असो’, असे फलक घेऊन ग्रामस्थ आले होते. ‘शिरोली नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शिरोलीचे सरपंच सलीम महात, उपसरपंच राजू चौगले, नागावचे सरपंच उत्तम सावंत, उपसरपंच राजू परीट, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, शशिकांत खवरे, सुरेश यादव, विजय जाधव, डॉ. सुभाष पाटील, सुरेश पाटील, आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरोली, नागावसह एमआयडीसी महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव महापालिकेतर्फे शासनास पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आहे. पावसाळ्यात पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरोलीतील ६० भागांत पसरते. शिरोलीस यापूर्वीच शासनाने पूरबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्राचा वापर निवासी अथवा अनिवासी क्षेत्रासाठी उपयोगाचा नाही. कोल्हापूर ते शिरोली दरम्यान सात किलोमीटर अंतर आहे. यातील पाच किलोमीटर अंतर पूरक्षेत्राचे आहे. शहर व गाव यामध्ये भौगोलिक सलगता नसल्याने ही गावे संभाव्य हद्दवाढीतून वगळावीत. कोल्हापुरातील उपनगरांना महापालिका आधीच पुरेशा सुविधा पुरवू शकत नाही. मग, नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांत पायाभूत सुविधा काय पुरविणार? ते अशक्य आहे. त्यामुळे संभाव्य हद्दवाढीतून या गावांना न वगळल्यास ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
हद्दवाढविरोधात निदर्शने
By admin | Published: June 24, 2014 1:15 AM