हेरले गावची १५ हजार लोकसंख्या असून गाव सहा प्रभागांत विखुरलेले आहे. गावात कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात कोसळलेले असून मृत्यूची संख्या वाढत आहे.
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत. सहाही प्रभागांत तुंबलेल्या गटारी स्वच्छ न केल्यामुळे दुर्गंधी पसरली असून साथीच्या रोगाची शक्यता नाकारता येत नाही.
नागोबा मंदिर, उर्दू शाळा, हेरले हायस्कूल, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कचऱ्याची मोठमोठी ढिगारे अनेक महिन्यापासून पडून आहेत. ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीने तात्काळ सर्व कचऱ्याचे ढीग, सर्व प्रभागातील गटर्स, ओढे, नाले स्वच्छ करावेत अन्यथा गुरुवार दि.२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोरोनाचे सर्व नियम पाळून निदर्शने करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी हेरले अध्यक्ष विश्वजित भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.