गडहिंग्लज :
अनुसूचित जाती आरक्षणातील वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी गडहिंग्लज विभागातील दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी येथील प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने लिहिलेले निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले. मातंग समाजाच्या आरक्षणाबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
दलितांची व्याख्या स्पष्ट असतानाही मातंग जातीला आरक्षणाचा लाभ कधीच मिळालेला नाही. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक विकासापासून हा समाज अजूनही वंचित दूर आहे. त्यामुळे दलित आरक्षणात वर्गवारी करून मातंग समाजाला न्याय द्यावा. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटींचा निधी द्यावा, कर्जाचे अनुदान २५ हजार करावे व शिष्यवृत्तीची रक्कम १० हजार करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष बाबूराव आयवाळे, मनोहर दावणे, प्रकाश कांबळे, शंकर कांबळे, विठ्ठल कांबळे, उमेश साठे, सुरेश चव्हाण आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
--------------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज प्रांत कचेरीसमोर दलित महासंघातर्फे निदर्शने करण्यात आली. आंदोलनात बाबूराव आयवाळे, प्रकाश कांबळे, शंकर कांबळे, मनोहर दावणे आदी सहभागी झाले होते. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : ०१०१२०२१-गड-०१