कोल्हापूर : किमान नऊ हजार पेन्शन आणि महागाई भत्त्यासाठी गुरुवारी ताराबाई पार्क येथील भविष्यनिर्वाह कार्यालयासमोर श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली पेन्शनरनी जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.ईपीएफ पेन्शनर्स संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवारी भविष्यनिर्वाह कार्यालयासमोर देशव्यापी आंदोलन केले. याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील भविष्यनिर्वाह कार्यालयासमोर पेन्शनर्सनी एकत्र येऊन निदर्शने केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी.
सर्व पेन्शनर्सना मोफत रेशन आणि वैद्यकीय सेवा देण्यात यावी. कॉम्युटेड पेन्शन जोडण्यासाठी १८० ऐवजी १२० महिने करावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याला पाच हजार किंवा तीन महिन्यांतील पेन्शनची जादाची रक्कम मदत म्हणून देण्यात यावी.
यावेळी श्रमिक संघाचे अतुल दिले, प्रकाश जाधव, अनंत कुलकर्णी, कमलाकर रोकडे, वसंत माने, इमाम राऊत, बाबा कोपणे, विलास चव्हाण, मारुती कोतमिरे, बबन कांबळे, आदी उपस्थित होते.