कोल्हापूर : शासकीय अध्यादेशाप्रमाणे सुधाकर जोशीनगर आणि स्वाधारनगर झोपडपट्टीच्या जागेत तातडीने घरकुल योजना राबवावी, आदी मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या वतीने बुधवारी महानगरपालिकेसमोर निदर्शने केली. मागण्या मान्य न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.शहरातील सुधाकर जोशीनगर व स्वाधारनगर झोपडपट्टीच्या जागेत नियमाप्रमाणे तातडीने शासकीय घरकुल योजना राबवावी, कुष्ठपीडित दिव्यांग बांधवांची थकलेली सात महिन्यांची पेन्शन शासनाने त्वरित द्यावी, ताराराणी चौकातील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात बांधकाम कामगार नोंदणी त्वरित करून घ्यावी; तेथील अनागोंदी कारभार थांबवावा, तसेच उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडून मागासवर्गीय बांधकाम कामगार नोंदविताना होत असलेल्या पक्षपातीपणाबाबत त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.
महापालिकेत गेली ४० वर्षे रोजंदारी काम करणाऱ्या कामगारांना कायम सेवेत घ्यावे, आदी मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या वतीने बुधवारी महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात दिव्यांग व्यक्तीही सहभागी झाल्या होत्या.मागण्यांचे निवेदन अतिरिक्त आयुक्तांकडे देण्यात आले. या आंदोलनात संभाजी कागलकर, बाळकृष्ण कांबळे, शिवाजी साळोखे, संजय सकट, संजय गुदगे, मल्लिकार्जुन पाटील, प्रभाकर कांबळे, गणेश कुचेकर, अविनाश बनगेल, सुरेश संदीमणी, रुद्राप्पा भूमाकनवर, कामू केसरे, आदींचा समावेश होता.