काेल्हापूर : पेट्रोल, गॅसच्या दराने कहर केला असून, सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण आणावे, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने सोमवारी शिवाजी चौकात निदर्शने केली.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. खाद्य तेल, धान्य, कडधान्य, गॅस, रेशनवरील धान्य बंद केल्यामुळे सामान्य जनतेचे जगणे अशक्य झाले आहे. गॅसचे दर महिन्यात शंभर ते सव्वाशे रुपयांनी वाढले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहतुकीचे दर वाढले आहेत. या सगळ्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने महिलांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे महिला दिनाचे औचित्य साधून शेकापने शिवाजी चौकात निदर्शने केली. यावेळी शहर चिटणीस बाबुराव कदम, संभाजीराव जगदाळे, दिलीपकुमार जाधव, राजाराम धनवडे, रंगराव पाटील, गीता जाधव, वैशाली सूर्यवंशी, प्रिया जाधव, शीतल पोहळकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : महागाई विरोधात सोमवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने केली. यावेळी बाबुराव कदम, संभाजीराव जगदाळे, दिलीपकुमार जाधव आदी उपस्थित होते. (फोटो-०८०३२०२१-कोल-शेकाप) (छाया- नसीर अत्तार)