कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी ऑनलाईनच घरात योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतीकात्मक, घरगुती व ऑनलाईन पद्धतीनेच यंदा योग दिन साजरा करण्यात आला.जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडासंकुलात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी सातपासून आमदार चंद्रकांत जाधव, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.इचलकरंजी येथील योग प्रशिक्षक सुहास पोवळे यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले. यानंतर योगपटू सेजल सुतार, गार्गी भट व ईश्वर वरदायी यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ क्रीडाशिक्षक युवराज मोळे व नाना पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार झाला.
यानंतर क्रीडा शिक्षकांसाठी खेळामध्ये मानसशास्त्राची भूमिका (रोल ऑफ सायकॉलॉजी इन स्पोर्टस ) या विषयावर डॉ. भूषण चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन झाले. यात त्यांनी गेम ॲग्रेशन, ॲटिट्यूड, एकाग्रता, खेळाडूंना असणारे ताण-तणाव, चिंता, रक्तदाब यांसह शारीरिक व मानसिक व्याधी यांवर मार्गदर्शन केले.पतंजली योग समितीतर्फे ह्यऑनलाईनह्ण देशव्यापी योग दिन साजरा करण्यात आला. आयुष मंत्रालयातर्फे हरिद्वार येथे मुख्य कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सकाळी ७ ते ८ या वेळेत देशभर झाले. कोल्हापूर शहरात सकाळी ९ ते १०, इचलकरंजी येथे सकाळी ६ ते ७, गारगोटी ७ ते ८ , देवकर पाणंद, यशवंत लॉन येथे ७ ते ८ यासह जिल्ह्यात १७ ठिकाणी ऑनलाईन योग करण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर खापणे यांनी दिली.शाहूपुरी परिसरातील सुकृत फौंडेशनच्या वतीने २१ जून या योग दिवसानिमित्त फौडेशनतर्फे घरोघरी योगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. फौडेशनचे सर्व सदस्यांनी आपल्या घरीच परिवारासह योगा केल्याची माहिती सुकृत फौंडेशनचे प्रमुख सुरेश शहा यांनी दिली.