कोल्हापूर : शहरात गेल्या काही महिन्यांपासून आढळून येत असलेल्या डेंग्यू रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतल्यानंतर काही प्रमाणात आटोक्यात आलेली साथ पुन्हा सुरू झाली आहे. एक आॅगस्टपासून आतापर्यंत ५० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून ९७ डेंग्यसदृश्य रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ही साथ आणखी फोफावते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.जानेवारी महिन्यापासून शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. सरकारी दवाखान्यात तपासण्या करण्याऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याने सुरवातीला त्याची गंभीरता स्पष्ट होत नव्हती. मात्र, महापालिका आरोग्य विभागाने आवाहन केल्यानंतर सरकारी दवाखान्यात मोठ्या संख्येने रुग्ण जाऊ लागले आणि त्याचे गांभीर्य लक्षात यायला लागले.
त्यानंतर महापालिका आरोग्य विभागाने अकरा पथके तयार करून सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम हाती घेतली. स्वच्छता मोहीमही राबविली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारच्या अखत्यारितील मलेरिया विभाग कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणखी दोन पथके स्थापन करण्यात आली.अलीकडे डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत होते; परंतु एक आॅगस्टपासून आणखी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. तेरा दिवसांत डेंग्यूचे ५० रुग्ण आढळून आले तर ९७ रुग्ण हे डेंग्यूसदृश्य म्हणून नोंद झाले आहेत. ही माहिती महापालिका सूत्रांनी दिली.महापालिका आरोग्य विभागाचे सर्वेक्षणाचे तसेच तपासणीचे काम मात्र मे महिन्यापासून अव्याहतपणे सुरू आहे. सोमवारीसुद्धा मंगळवार पेठ, राजारामपुरी, कोरगांवकर हौसिंग सोसायटी, यादवनगर, जीवनछाया रेसिडेन्सी, महाडिक माळ, नेहरूनगर, राजेंद्रनगर, क्रशर चौक, विचारेमाळ, सदर बाजार, सोमवार पेठ आदी परिसरातील ४४९ घरांतून तपासणी करण्यात आली.
या मोहिमेत ९०० कंटेनर तपासले गेले तर त्यापैकी २९ कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. सर्व कंटेनर रिकामे करण्यात आले. याशिवाय टायर्स दुकाने, बांधकाम साईटदेखील तपासण्यात आल्या. त्या परिसरात धूर तसेच औषध फवारणी करण्यात आली.