कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीत जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यातील डेंग्यू, चिकुनगुनियाची रुग्णसंख्या काहीशी कमी असली, तरी साथ कायम असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शहरातील सर्वच रुग्णांची नेमकी माहिती खासगी रुग्णालयाकडून नोंदविली जात नसल्याचेही त्यावरून स्पष्ट होते.
महानगरपालिका हद्दीत अनेक भागात डेंग्यू, चिकुनगुनिया या साथीच्या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. काही भागात तर घरटी रुग्ण असल्याचे पाहायला मिळते. शासकीय रुग्णालयात ज्यांच्या तपासण्या होतात, त्याची नोंद महापालिकेकडे होते, परंतु खासगी रुग्णालयातील चाचण्यांचे अहवाल महापालिकेकडे येत नसावेत, अशी शंका आकडेवारीवरून घेतली जात आहे.
ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे ५२ रुग्ण सरकारी लॅबमध्ये, तर खासगी लॅबमध्ये २१ अशा ७३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याचवेळी चिकुनगुनियाच्या १५ रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात ९० रुग्ण सापडले होते. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात रुग्णांची संख्या कमी दिसत असली, तरी साथ मात्र कायम आहे.
सध्या शहरात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू असल्यामुळे डेंग्यूचे सर्वेक्षण थांबले आहे. केवळ कीटकनाशक विभागातर्फे औषध फवारणी व धूर फवारणी सुरू आहे. सर्वेक्षण थांबल्यामुळे रुग्णांची नेमकी माहिती मिळत नाही. शहरात ए, बी व ई वॉर्डात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
डेंग्यूचे रुग्ण -
जून ४४
जुलै ९०
ऑगस्ट ७४