गांधीनगर : गांधीनगरसह परिसरात डेंग्यू, चिकनगुनिया साथीचे थैमान सुरू असून, परिसरातील खासगी दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. कोरोनाचे संकट टळले नसताना आता डेंग्यूने डोके वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. गांधीनगरमधील इंदिरानगर झोपडपट्टी वसाहत, मसोबा माळ परिसर, कोयना कॉलनी, पाच बंगला, गडमुडशिगी येथील हुडा भाग, माळवाडी, बागडी वसाहत, रेल्वे स्टेशन परिसर, गावभाग, मातंग वसाहत तर वळीवडेतील मेघराज कॉलनी, वसंन शहा कॉलनी, ट्रान्सपोर्ट लाईन इत्यादी ठिकाणी घराघरात रुग्ण आढळून येत आहेत. उंचगाव पूर्वभागातील निगडेवाडी परिसरासह अन्य ठिकाणी ताप, खोकला, सर्दी, सांधेदुखी, अंगदुखी या साथीचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अनेकजण उपचारासाठी खासगी दवाखान्यांची वाट धरत आहेत. गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड, ट्रान्सपोर्ट लाईनचा मुख्य रस्ता या भागात स्वच्छतेचा अभाव आहे. सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना रोगांना सामोरे जावे लागत आहे. अनेक भागातील कचरा वेळोवेळी उठाव होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे साम्राज्य आहे. वळीवडे कॉर्नर येथील एका मुख्य रस्त्यावरील गटारीचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. योग्य ठिकाणी औषध फवारणी केली जात नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. या सर्व कारणांमुळे या साथीच्या रोगाने परिसरात उच्छाद मांडला आहे. घरोघरी रुग्ण आढळत असल्याने नागरिकांना आर्थिक व शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
परिणामी संबंधित प्रशासनाने अशा साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. गांधीनगर परिसरातील प्रत्येक ग्रामपंचायतीने याची खबरदारी म्हणून उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.