कोल्हापूर : डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले असताना जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांचे मोबाईल आज, रविवारी स्वीच आॅफ होते. यावरून एकीकडे नागरिक डेंग्यूची धास्ती घेत आहेत, तर दुसरीकडे प्रशासन निवांत असल्याचे दिसत आहे. सध्या येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दोन रुग्ण उपचार घेत आहेत, पण त्यांच्या अहवालात त्यांना डेंग्यूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या सात महिन्यांत सीपीआरमध्ये ४५हून अधिक रुग्ण उपचार घेत होते. त्यातील ४० जणांना घरी पाठविण्यात आले. या आठवड्यात भुदरगड, आजरा, पन्हाळा या तालुक्यांतील पाच रुग्ण उपचार घेत होते. त्यातील तीनजणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. काल, शनिवारी तळसंदे (ता. हातकणंगले) येथील पूनम आनंदा घाटगे या मुलीचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. सध्या दोन रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात सुमारे ५७ प्रभागांत औषध व धूर फवारणी केली आहे. दरम्यान, याबाबत महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील व सीपीआरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल ‘स्वीच आॅफ’ होता.
डेंग्यूची धास्ती; अधिकारी निवांत
By admin | Published: November 17, 2014 12:04 AM