कोल्हापूर : शहरातील जवाहरनगर, नेहरूनगर, कदमवाडी, जाधववाडी, शहाजी वसाहत, आदी भागांत घरोघरी डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून येत असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत; पण शहरातील अनेक खासगी रुग्णालये डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांनी भरली असताना त्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करून फक्त काही खासगी रुग्णालयांतून येणाºया ‘डेंग्यू’ रुग्णांच्या तोकड्या आकडेवारीवर समाधान मानत आहे. दिवसभरात शहराच्या विविध भागांत गुुरुवारी डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले सुमारे ४९ रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी सर्व्हेदरम्यान फक्त २३ रुग्ण आढळले आहेत.महापालिका सभेत सदस्यांनी शहरातील डेंग्यू आजारावरून प्रशासनावर टीकेची झोड उठविल्यानंतर बुधवार (दि. २०) पासून महापालिका यंत्रणा कामाला लागली असून, सुमारे ११ पथकांद्वारे शहराच्या वेगवेगळ्या भागांत प्रतिबंधात्मक विशेष मोहिमेद्वारे सर्वेक्षण व प्रबोधनाचे कार्य सुरू केले आहे. जवाहरनगर, नेहरूनगर, कदमवाडी, जाधववाडी, आदी भागांत घरोघरी डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळू लागल्याने ते सर्वजण शहरातील अनेक खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत; पण ती नेमकी रुग्णसंख्या मात्र महापालिकेच्या यंत्रणेपर्यंत पोहोचत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे कितीही आवाहन करूनही खासगी रुग्णालयाकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे अगर तापाच्या रुग्णांची तोकडीसंख्या महापालिकेपर्यंत पोहोचत आहे.डासांच्या अळ्या आढळल्यामहापालिकेने गुरुवारी कनाननगर (२० कुटुंबांकडे अळ्यायुक्त पाणी), जुना बुधवार पेठ (३० कुटुंबे), महाडिक माळ (३३ कुटुंबे), जवाहरनगर (०८ कुटुंबे), देवकर पाणंद (५२ कुटुंबे), शहाजी वसाहत ( ६७ कुटुंबे), इत्यादी ठिकाणी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागरी कुटुंब कल्याण केंद्र (दवाखाना), इत्यादी विभागांनी संयुक्तपणे डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये २९७४ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी २१० कुटुंबांकडील साचलेल्या पाण्यात डास व अळ्या आढळून आल्या; तर खरमाती उठाव केलेली २६ ठिकाणे, तसेच ४९ ठिकाणांची पाण्याची डबकी बुजविण्यात आली.
कोल्हापुरात ‘डेंग्यू’चा विळखा तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:02 AM