कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत सुरू केलेल्या डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेत मंगळवारी ९ प्रभागांतील १७८५ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २८१६ कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये ८९ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या असून, त्या टेमीफॉस हे द्रावण टाकून नष्ट करण्यात आल्या. प्रभाग क्रमांक ३, ११, १८, २९, ४४, ४८, ६६, ७६, ७८ येथे तपासणी झाली.
कोल्हापूर शहरात डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी नऊ पथके नियुक्त केली आहेत. या पथकांकडून मंगळवारी ९ प्रभागांतील १७८५ घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यामध्ये ८९ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या असून येथे अळीनाशक टेमीफाॅस हे द्रावण टाकण्यात आले.
पुढील दिवसांमध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेमध्ये डास अळी सर्वेक्षण, औषध फवारणी व धूर फवारणी तसेच टायर जप्ती मोहीम व शौचालयाच्या व्हेंट पाइपला जाळी बांधण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे.
एका पथकामध्ये १२ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली अशी नऊ पथके आहेत. यांच्याकडून ८१ प्रभाग पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
कोरडा दिवस पाळा
नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. टायर, नारळाच्या करवंट्या, फुटके डबे जेणेकरून पाणी साठणार नाही अशा वस्तूंचा त्वरित नायनाट करून डेंग्यू, चिकनगुणिया असे जीवघेणे आजार नियंत्रित ठेवा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.