कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात डेंग्यू, चिकनगुनिया साथीच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येत असून शुक्रवारी शहरातील नऊ प्रभागांतील ८७५ नागरिकांच्या घरी केलेल्या सर्वेक्षणात ८१ घरात डास अळी सापडून आल्या.
महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून दैनंदिन शहरामध्ये औषध फवारणी, धूर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. शुक्रवारी शहरात आरोग्य विभागामार्फत प्रभाग क्र. २, ३, ६, १८, २४, ३१, ३६, ४१, ४६ येथे ८७५ घरातील २२२३ कंटेनरांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथून डेंग्यूसदृश ८१ ठिकाणी डास अळी शोधून काढल्या.
या दूषीत पाण्याच्या ठिकाणी तातडीने औषध फवारणी, धुर फवारणी करण्यात आली. तसेच दूषीत पाण्याच्या ठिकाणी असलेल्या टायरी जप्त करुन पाण्याच्या ठिकाणी गप्पी मासे कर्मचाऱ्यांमार्फत सोडण्यात आले.
शहरातील नागरिकांनी डेंग्यू, चिकनगुनियाची लक्षणे आढळल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागास अथवा शासकीय रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा, सेप्टीक टँक व्हेंट पाईपला जाळी बसविणेत यावी, आठवड्यामध्ये एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा, फ्रिजमधील डिफ्रॉस स्ट्रेमधील पाणी आठ दिवसांतून एकदा रिकामे करण्यात यावे, घराजवळील परिसरामध्ये रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या, डबे इत्यादीमध्ये पाणी साचू देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.