कोल्हापूर, दि. २४: पुंडलिक वरदा हरि विठ्ठलच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात पन्हाळगडची पायी वारकरी दिंडी मोठ्या उत्साही वातावरणात पंढरपूरला रवाना झाली. पहाटे चार वाजता गडावरील महालक्ष्मी, मारुती आदि दैवतांचे दर्शन घेऊन दिंडीप्रमुख उमेश कुलकर्णी, ह.भ.प. राजेंद्र परिट बुवा आणि मिलिंद बांदिवडेकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडीने प्रयाण केले. यंदा दिंडीचे चवथे वर्ष आहे.
दिंडीच्या पहिल्या दिवशी वाघबीळ, माले, केखले, जाखले, बहिरेवाडी, नवे पारगाव, तळसंदे, वाठार असा पायी प्रवास करुन दिंडी भादोले येथे मुक्कामी थांबली. पहाटे चार वाजता निघालेली दिंडी सकाळी साडेसात वाजता माले येथे पोचली. माले येथे तेथील रहिवासी पोलिस निरीक्षक धुमाळे यांनी दिंडीचे स्वागत केले. तेथे काकडआरती करुन दिंडी पुढे मार्गस्थ झाली.
केखले येथे बाळासाहेब कदम यांनी दिंडीचे स्वागत करुन वारकऱ्यांना आपल्या निवासस्थानी अल्पोपहार दिला. दुपारी एक वाजता दिंडी तळसंदे येथे पोचली. तेथे सरिता पांगे यांच्या निवासस्थानी वारकऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. थोडावेळ विश्रांती घेऊन, भजन करुन दिंडी वाठारमार्गे भादोले येथे मुक्कामी पोचली.
दिंडीमध्ये कोल्हापूर येथील प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. बी. आर. कोरे, सौ. कोरे यांच्यासह २५ जणांचा सहभाग आहे. महिलांचा सहभागही लक्षणीय आहे. दिंडीच्या पहिल्या दिवशीच्या पन्हाळा ते वाठार या २६ किलोमीटरच्या प्रवासात कोल्हापूरचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, कवयित्री डॉ. सई लळीत सहभागी झाले होते. मजल दरमजल करीत दिंडी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पोचेल.