बाबासाहेब नेर्ले ।गांधीनगर : कृषी विभागाने सुरू केलेल्या पाचट अभियानाचा गांधीनर, वळिवडे परिसरात फज्जा उडाल्याचे वास्तव पुढे आले आहे. ग्रामीण भागातील काही शेतकरी ऊस तुटून गेल्यानंतर शिल्लक पाला लगेच पेटवत असल्याने प्रदूषणात भर पडत आहेच, शिवाय जमिनीची सुपीकताही नष्ट होत आहे. त्यामुळे शेती विभागाने सुरू केलेल्या या अभियानास खो बसला आहे.
शेती आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असताना ऊसशेती, इतर पिकांमध्ये दररोज नवनवीन प्रयोग होत आहेत. शेतकरी आपल्या शेतामधील पुढील पीक लागणीसाठी तसेच तण काढण्याच्या उद्देशाने उसाचे पाचट पेटविण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहे. उसाचे पाचट पेटविल्याने हवेचे प्रदूषण तर होतेच, पण जमिनीचेही फार मोठे नुकसान होते. ऊसपीक व्यवस्थापनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
त्या जमिनीची प्रत चांगल्या प्रकारची राहण्यासाठी किंबहूना ठेवण्याची मानसिकता शेतकºयांमध्ये कमी होताना दिसत आहे. काही शेतकरी ऊस तोडून कारखान्यास घालवतात अन् लगेच वेळ न घालवता दुसºया ऊस लावणीची तयारी करतात. यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात येते. कृषी विभाग किंवा कृषी मंडल अधिकाºयांच्या सल्ल्याने नवनवीन तंत्रज्ञान वापरून तसेच पिकांची फेरपालटणी, दोन पिकांतील अंतर, तसेच रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा वापर या बाबींची माहिती घेऊन शेती केल्यास ती फायद्याची ठरणार आहे. काही शेतकरी जमिनींमध्ये विघातक रासायनिक खतांचा वापर बेसुमार करतात.
त्यामुळे जमीन कडक बनून सुपिकता नष्ट होत आहे. भागातील जनावरांची संख्या कमी होत चालल्याने शेणखत मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे उसाचे पाचट फायदेशीर ठरते आहे. ते जमिनीत गाडल्याने किंवा पाचट कुट्टी करून घेतल्याने सेंद्रिय खत आपल्याला उपलब्ध होते. या पाचट व्यवस्थापनामुळे जमिनीत गारवा (वाफसा) निर्माण होऊन पीक वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. शासनाने दोन वर्षांपासून सुरू केलेल्या या पाचट अभियानाचे महत्त्व अजूनही म्हणावे तेवढे बळिराजाने मनावर न घेतल्याने बळिराजाचे आर्थिक आणि जमिनीचे नुकसान होत आहे. पाचट राखल्याने प्रदूषणही होणार नाही आणि आर्थिक भुर्दंडही बसणार नाही. प्रत्येक शेतकºयाने आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून शेती केल्यास फायदेशीर ठरणार आहे.पाचट पेटविल्यास नुकसानपाचट पेटविल्यास अन्नद्रव्यांबरोबर पीक वाढीसाठी आवश्यक असणाºया जीवाणूंचा नाश होऊन बळिराजाचे नुकसान होते. फायदेशीर ऊसपीक करण्यासाठी एकसरी आड पाचट ठेवून त्यावर प्रतिएकरी ५० किलो युरिया, २० किलो सुपर फॉस्फेट व ५ किलो पाचट कुजविणारे जीवाणू, १०० किलो शेणखत मिसळून द्यावे, त्यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते व उत्तम सेंद्रिय खताची निर्मिती होते. पाचट ठेवल्याने तण उगवण्याचे प्रमाण कमी होऊन मशागत खर्च कमी येतो. सगळ्यात महत्त्वाचे पाण्याचे प्रमाण कमी लागते. यामुळे शेतकºयाचे आर्थिक नुकसान होत नाही.