- एकनाथ पाटीलकोल्हापूर : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांच्या कुटुंबीयांना कोल्हापुरात रो हाऊस देण्याची घोषणा करणारा सचिन सापळे (४३) हा भामटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने अनेक जणांना फसविल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर येथील स्कॉर्पिओ गाडी खरेदी-विक्री व्यवहारामध्ये सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित सचिन सापळे याला शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी त्याच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला.संशयित सापळे या भामट्याने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जवान नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन जवानांच्या कुटुंबीयांना कोल्हापुरात रो हाऊस देण्याची घोषणा कागल येथे सहा महिन्यापूर्वी केली होती. या दोन जवानांच्या कुटुंबियांना अद्यापही त्याने रो हाऊस दिलेले नाही. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी त्याने शहीद जवानांच्या नावाचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. सापळे याच्यावर कोल्हापुरात दोन आणि शिर्डी येथे एक असे तीन गुन्हे दोन दिवसांत दाखल झाले आहेत.स्कार्पिओ गाडीच्या व्यवहारामध्ये सहा लाखांची फसवणूक करणाऱ्या सापळे याची बनवेगिरी आता पोलीस चौकशीत उघडकीस येत आहे. कोल्हापूर शहरातील १५ हॉटेल-लॉजमालकांना सुमारे १५ लाखांना गंडा घातला आहे. हॉटेलवर राहून त्यांचे पैसे आॅनलाईन भागवितो म्हणून बाहेर पडून पुन्हा त्याने पैसेच दिलेले नाहीत. काही इलेक्ट्रिक दुकानांतून किमती टिव्ही, मोबाईल खरेदी केले आहेत. त्यांचे पैसेही त्याने दिलेले नाहीत. खोटे धनादेश देऊन त्याने आतापर्यंत वेळ मारून नेली होती. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांची भेट घेतली. सापळेचे कारनामे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. चंदगड येथील एका शिक्षण संस्थेच्या नावाखाली ३० लोकांना सुमारे ४० लाखांचा गंडा घातला आहे.
शहिदांच्या कुटुंबीयांना घरे देण्याची घोषणा करणारा निघाला भामटा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 12:55 AM