मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या आणि नवीन इमारतींच्या सुरक्षिततेसाठी शासनाने तब्बल तीन सुरक्षारक्षकांची नेमणूक केली असून, त्यातील दोन सुरक्षारक्षक हजर झाले आहेत. इमारतीला पार्किंग स्टँड होण्यापासून वाचवण्यासाठी सर्व परिसरात ‘नो पार्किंग’चे बोर्ड लागले असून, जुन्या इमारतीच्या समोरील मुख्य दरवाजा कायमचा बंद ठेवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, गाड्या पार्क करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत. बुधवारच्या ‘लोकमत’मधून ‘मुरगूडचे ग्रामीण रुग्णालय बनले पार्किंग स्टँड’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेऊनच प्रशासनाने तत्काळ पावले उचलल्याने बेवारस गाड्या पार्किंगपासून आता जुन्या व नव्या इमारतीची सुटका होणार हे निश्चित. जुन्या इमारतीचा वापर कमी होत असल्याने आणि प्रशासनाचे या इमारतीकडे दुर्लक्ष असल्याने ही इमारत म्हणजे सार्वजनिक मालमत्ताच बनली होती. आवाराबाहेर अगदी इमारतीच्या व्हरांड्यातही दुचाकी बिनधास्तपणे लावल्या जात होत्या. या दुचाकीस्वारांना वठणीवर आणण्यासाठी आणि संपूर्ण परिसराचे संरक्षण करण्यासाठी सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त कार्यालयाकडून तीन सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी बुधवारी सुभाष तुकाराम राऊत (रा. गारगोटी) व नवनाथ परीट (रा. आवळी) हे दोघे सुरक्षारक्षक रुग्णालयात हजर झाले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये ‘नो पार्किंग’चे बोर्ड लावले असून, काही दुचाकीस्वारांना समजावून सांगितले आहे. शिवाय जुन्या इमारतीच्या मुख्य दरवाजातून नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता रहदारीचा झाला होता. रस्ता बंद करण्यासाठी जुन्या इमारतीसमोरील मुख्य प्रवेशद्वार कायमचे बंद करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.
मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात सुरक्षारक्षक तैनात
By admin | Published: March 06, 2016 10:31 PM