कोल्हापूर : विविध राज्यात आलेल्या बर्ड फ्लू रोगांच्या प्रादुर्भावाबाबत व त्या आनुषंगाने जिल्ह्यात करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी बैठक घेऊन आढावा घेतला. पूर्वतयारी म्हणून एक जिल्हास्तरीय नियंत्रण समिती व तेरा अतिजलद प्रतिसाद पथकांची (आरआरटी) नियुक्ती केली आहे.केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांच्यासह तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. संभाव्य संकटाची तयारी म्हणून गाव पातळीवर सूचना देण्यात आल्या.
पक्ष्यांमध्ये अनैसर्गिक मृत्यू आढळल्यास त्याची तत्काळ माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेला देण्यात यावी. त्याचबरोबर पशुवैद्यकीय संस्थेमार्फत नेसल स्वॅबसह रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्याची सूचनाही जिल्हाधिकारी देसाई यांनी केली.माणसांना धोका नाहीकोंबड्यांचे मांस व अंडी शिजवून खाल्यामुळे त्यातील विषाणू जिवंत राहत नाहीत. त्यामुळे या रोगाचा माणसांना काहीही धोका नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
बर्ड फ्लू प्रादुर्भाव व प्रसाराबाबत मार्गदर्शक सूचना-
- अचानक पक्ष्यांचा मृत्युबाबत तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यास कळवावे.
- संशयित क्षेत्रावरून पक्ष्यांची वाहतूक पूर्ण बंद करावी.
- उघड्या कत्तलखान्यात जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी.
- या रोगाचे जंतु डुकरांमध्ये किंवा त्याच्याकडून संक्रमित होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.