जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यामधील नुकसानग्रस्त थकीत २६५ शेतकऱ्यांच्या पीककर्जाची २ कोटी २५ लाखांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. २०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची रक्कम तर काहींना पीक कर्जमाफी मिळाली होती. त्यामधील काही शेतकऱ्यांचे उशिरा झालेले पंचनामे व संबंधित बँकांच्या चुकीच्या माहितीमुळे शिरोळसह जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. याबाबतचा अहवाल जिल्हा लेखापरीक्षण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीची रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी केली होती. यावेळी सहकार व पणन विभागाने परिपत्रकाद्वारे प्रलंबित पीक कर्जाच्या रकमेला मंजुरी दिली होती.
त्यानंतर शिक्षक व पदवीधर संघ विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नव्हती. त्यानंतर पुन्हा या मागणीसाठी पाठपुरावा केल्यानंतर २२ मार्चला परिपत्रक काढून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत असलेल्या पीक कर्जाचा लाभ व त्यांच्या रकमा जमा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मंत्री यड्रावकर यांनी दिली.