कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत १५ टक्के निधीतून मागासवर्गीय अनुसूचित जाती समाजातील कुटुंबात प्रथम जन्मास येणाऱ्या कन्येच्या नावे ५ हजार रुपये ठेव पावती तसे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी रुपये २,५०० रुपये निधी देण्याचा निर्णय ग्रामपंचायत बैठकीत झाल्याची माहिती सरपंच चंद्रकांत चव्हाण यांनी दिली. या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजातून समाधान व्यक्त होत.
सरपंच चव्हाण म्हणाले, ग्रामपंचायत कर वसुलीच्या १५ टक्के रक्कम मागासवर्गीय प्रभागात खर्च करण्याचा शासन आदेश आहे. या रकमेतून समाजातील बहुतेक समस्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. मुलींचा जन्मदर घटत असल्याने व नव्याने जन्मनाऱ्या मागासवर्गीय मुलींचा सन्मान करण्यासाठी ग्रामपंचायतीने मागासवर्गीय १५ टक्के निधीतून मागासवर्गीय समाजात जन्माला येणाऱ्या पहिल्या मुलीच्या नावे ५ हजारांची ठेव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवाय हा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने समाजातील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी २,५०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या १५ टक्के आरक्षित निधींचा उपयोग चांगल्या कामासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
समाजातील नव्याने जन्माला येणाऱ्या पहिल्या मुलीच्या नावे सावित्रीबाई फुले कन्या योजना या नावाने ठेव पावती केली जाणार आहे. १४ एप्रिलपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती सरपंच चव्हाण यांनी दिली. यावेळी उपसरपंच संभाजी कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.