कोल्हापूर : जबाबदार व्यक्तींना लवकर नियुक्त करून विद्यार्थ्यांच्या खात्यावर दि.२० एप्रिलपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या (एआयएसएफ) वतीने शुक्रवारी करण्यात आली. त्याबाबतचे निवेदन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना देण्यात आले.
शिवाजी विद्यापीठामध्ये सन २०१६ ते २०१८ या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची भारत सरकार शिष्यवृत्ती तीन वर्षे प्रलंबित आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनास वारंवार आंदोलनाद्वारे निवेदने देण्यात आली आहेत. तरीही प्रशासनाचा कारभार गाफीलपणे सुरू आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत होत आहे. कुलगुरूंनी याचा गांभीर्याने विचार करावा. जबाबदार व्यक्तींना लवकरात लवकर नियुक्त करून दि.२० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी; अन्यथा विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात कठोर पावले उचलली जातील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी प्रशांत आंबी, धीरज कठारे, हरीश कांबळे, आरती रेडेकर, योगेश कसबे उपस्थित होते.