लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘ गोकुळ ’ दूध संघाच्या निवडणुकीत माजी संचालक दिनकर संतू कांबळे यांच्यासह तिघांची डिपॉझिट जप्त झाली. एकूण वैध मताच्या १/६ मते पडणे गरजेचे असते.
‘ गोकुळ ’ ची निवडणूक सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये झाली. संघाच्या २१ जागांसाठी दोन्ही आघाडीचे ४२ उमेदवार तर अपक्ष तिघे रिंगणात होते. सर्वसाधारण गटातून शामराव गोपाळ बेनके, महिला गटातून वैशाली बाजीराव पाटील तर अनुसूचित जाती गटातून दिनकर संतू कांबळे हे अपक्ष म्हणून रिंगणात होते. अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीत विरोधी आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकत पहिल्यांदाच सत्तांतर घडवले. तर सत्तारूढ गटाला चार जागा मिळाल्या. अटीतटीच्या लढतीमुळे विजयी व पराभूत उमेदवार मधील मतांचे अंतर फार कमी होते. ४० मतांच्या फरकाने पराभूत झालेले चार-पाच उमेदवार होते.
अपक्ष शामराव बेनके यांना १८, वैशाली पाटील यांना १२ तर दिनकर कांबळे यांना १९ मते मिळाली. त्यामुळे या तिघांची डिपॉझिट जप्त झाली आहे. बेनके व वैशाली पाटील यांची प्रत्येकी दोन हजार तर कांबळे यांची पाचशे रूपये असे साडेचार हजार रूपये डिपॉझिट रक्कम सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘ गोकुळ ’ च्या अध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी (दि. १४) होत आहे. अध्यक्ष पदाच्या शर्यतीत ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरूण डोंगळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. दोघांनीही सत्तारूढ गटातून बाहेर पडण्याचे धाडस केले होते. त्यामुळे दोघांपैकी कोणाला संधी द्यायची, असा पेच नेत्यांसमोर आहे. गुरूवारी (दि. १३) पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विरोधी आघाडीच्या नेत्यांची बैठक होत आहे. येथे अध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. पाटील व डोंगळे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
उमेदवारांना खर्च देण्यासाठी ६० दिवसांची मुदत
उमेदवारांना दोन लाखांपर्यंत निवडणूक खर्च करण्याची मुभा होती. हा खर्च सविस्तरपणे निवडणूक निकालानंतर ६० दिवसात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे.