कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीमुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहण्याची भिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यापुढच्या काळात दोन्ही कॉँग्रेसना भवितव्य नसल्याने शरद पवार यांनी ‘एनडीए’मध्ये यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आठवले म्हणाले,‘वंचित आघाडी’ ही दलितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. काही ठिकाणी उमेदवाराचीच ताकद जास्त असल्याने त्यांनी मते खाल्ली. त्यामध्ये ‘वंचित’च्या प्रभावाचा प्रश्न येत नाही. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता ‘एनडीए’सोबत यावे. मात्र आम्हांला ओवेसी चालणार नाही. विधानसभेला १८ पैकी १० जागा आरपीआय आठवले गटाला मिळाव्यात, आगामी विस्तारावेळी मंत्रिपद मिळावे, ५० कार्यकर्त्यांना महामंडळामध्ये स्थान मिळावे, या आपल्या मागण्या आहेत, असेही आठवले यांनी या वेळी बोलताना सांगितले.
भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाहीमित्रपक्षांना भाजप कमळ चिन्हावर लढण्याचा आग्रह करीत असल्याबाबत विचारल्यानंतर, ‘कोणत्याही परिस्थितीत आम्ही कमळ चिन्हावर लढणार नाही,’ असे आठवले यांनी स्पष्ट केले. गेल्या वेळीही आम्ही आमच्या चिन्हावर लढलो होतो, याची आठवण त्यांनी करून दिली.