दादांचा वादा.. के. पी. पाटील यांना मिळाला 'बिद्री'चा इरादा; डिस्टलरी प्रकल्पाला इरादा पत्र मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:22 PM2023-09-14T13:22:18+5:302023-09-14T13:32:23+5:30
आजी-माजी आमदारांच्या आरोपांना पूर्णविराम मिळाला
दत्ता लोकरे
सरवडे : कोल्हापुरात तपोवन मैदानावर झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला उपस्थित राहून दादांच्या नेतृत्त्वाबद्दल बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी जोरदार भाषण ठोकल्याचा परिणाम म्हणून कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाला तातडीने बुधवारी इरादा पत्र मंजूर झाले. त्यामुळे के. पी. पाटील यांचा इरादा नेक होता, त्यामुळेच बिद्रीचा मद्यार्क प्रकल्प सेफ झाला, अशी चर्चा कार्यक्षेत्रात आहे.
बिद्री साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर विस्तारीकरणाचा मोठा टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर १३५ कोटी रुपयांचा डिस्टलरी प्रकल्प पूर्णत्वास येत असतानाच इरादा पत्राची अडवणूक झाली आणि हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी के. पी. पाटील यांनी बदलत्या राजकीय समीकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तशी अवघ्या काही दिवसांतच इरादा पत्राला मंजुरी मिळाली.
हा प्रकल्प उभा करताना प्रकल्पामुळे कारखाना पूर्ण तोट्यात जाणार, अशी टीका त्यांच्यावर झाली. इथेनॉल मद्यार्क निर्मितीचा १३५ कोटी रुपयांचा प्रकल्प उभा करण्याचे काम सुरू झाले. मात्र, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या इरादा पत्राला आमदार प्रकाश आबिटकर यांनी आक्षेप घेत विरोध दर्शविला. राज्यातील बदलत्या समीकरणात के. पी. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाबरोबरच बिद्रीचाही इरादा पक्का होता, हे त्याचवेळी निश्चित झाले.
के. पी. पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत या सभेला हजेरी लावली आणि बिद्रीच्या इरादा पत्राला अखेर मंजुरी मिळाली. आजी-माजी आमदारांच्या आरोपांना पूर्णविराम मिळाला.
सहवीज प्रकल्पामुळे बिद्री कारखाना आर्थिकदृष्ट्या भक्कम झाला. गतवर्षी ८ लाख टन गाळपाची नोंद झाली. त्यामुळे विस्तारीकरणावर शिक्कामोर्तब झाले. आता इथेनॉल प्रकल्प ऊस उत्पादक सभासदांना आर्थिक स्थैर्य मिळवून देईल. - के. पी. पाटील, अध्यक्ष, बिद्री साखर कारखाना