कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या प्रश्नावर 19 सप्टेंबर पूर्वी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात आज, शनिवारी सकाळी झालेल्या बैठकीत दिले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उद्या, रविवारच्या दौऱ्यात आंदोलन करण्याचा निर्णय मराठा समाजाने स्थगित केला.सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्या दरम्यान आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री केसरकर व मंत्री मुश्रीफ तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याबरोबर सकल मराठा समाज यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री केसरकर यांनी 19 सप्टेंबरला गणेशोत्सवापूर्वी मुंबईत मंत्रालयामध्ये सकल मराठा समाज आरक्षणाबाबत तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन दिले. पालकमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर सर्वानुमती उद्याचे आंदोलन स्थगित केले. मात्र, याबाबत सरकारकडून दिलेला शब्द जर नाही पाळला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी बैठकीस वसंतराव मुळीक, आर के पवार , बाबा पार्टे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, बाबा इंदुलकर, अनिल घाडगे, धनंजय सावंत, शाहीर दिलीप सावंत, सुशील भांदिगिरे, मयूर पाटील, काका पाटील, काका जाधव, अमर निंबाळकर इत्यादी उपस्थित होते..
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळचे आंदोलन स्थगित, पण..; सकल मराठा समाजाने दिला इशारा
By विश्वास पाटील | Published: September 09, 2023 4:09 PM