'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 02:58 PM2024-01-29T14:58:37+5:302024-01-29T15:00:02+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकत नोंदवण्याचे ठरवण्यात असल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जाणार हे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. काल प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाला नाराज करून चालत नाही, असं अजित पवार यांनी सांगितले. तसेच मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसून छगन भुजबळ यांच्याशी बोलू. कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केले. अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, राज्य सरकारच्या अध्यादेशामुळे मराठा समाजाचे हक्क त्यांना सहज उपलब्ध झाले आहेत. नोंदणीकृत मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळणे कायदेशीर होते. काही नेत्यांची वैयक्तिक भूमिका यावर वेगळी असू शकते. प्रत्यक्षात काय केले ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. सरकारने मराठा समाजाला फायदा होणारा निर्णय घेतला आहे. पण कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. यात कोणाचीही काळजी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले.
कोणीही मुंबईवर मोठे मोर्चे घेऊन आले तर...
ओबीसींच्या बाबतीत जो निर्णय झाला तसाच निर्णय दलित आणि आदिवासींच्या बाबतीतदेखील घडू शकतो. कोणीही मुंबईवर मोठे मोर्चे घेऊन आले तर त्यांना आदिवासी आणि दलित समाजात आरक्षण मिळू शकेल, त्यामुळे मूळ जाती-जमातींनादेखील नव्याने मागणी करणाऱ्यांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
ओबीसी समाज समाधानी, आमच्यावर अन्याय नाही-
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करताना ओबीसींच्या अस्तित्वाला कुठेही धक्का लावलेला नाही. त्यामुळे ओबीसी समाज समाधानी आहे. आमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही. सरकार आमच्याशी धोका करतोय असे वाटेल त्या दिवशी ओबीसी समाज घराघरांतून निघेल. - बबन तायवाडे, अध्यक्ष, ओबीसी महासंघ